कोल्हापूर : देशाच्या अनेक ख्यातनाम महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या विरोधात कुस्तीपटूंचे गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर - मंतरवर आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला कोल्हापुरातून देखील पाठिंबा मिळत असून कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरातील पापाची तिकटी येथे सर्व पक्षीय महिला संघर्षकृती समितीने एल्गार पुकारला आहे. ब्रिजभूषण विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
कुस्तीप्रेमी महिलांचे आंदोलन : भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर - मंतरवर महिला कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. मात्र तरीही केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे महिला कुस्तीपटूंचे खच्चीकरण होत आहे. भाजपचे खासदार असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. यानंतर ब्रिजभूषण यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी त्यांच्यावर अद्याप कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही. या विरोधात कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापूरमध्ये कुस्तीप्रेमी आणि महिलांनी एकत्र येत एल्गार पुकारला असून आज सकाळपासून दिल्लीतील महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वपक्षीय महिलांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले आहे. सर्वपक्षीय महिला संघर्षकृती समितीच्या वतीने ब्रिजभूषण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे. या आंदोलनात महिलांना पाठबळ देण्यासाठी पुरुष पहलवान देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे महिला कुस्तीपटू भगिनी आंदोलन करत आहेत. या कुस्तीपटूंवर खासदार ब्रिजभूषण सिंह ने जे अत्याचार केले त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. ज्या शाहू महाराजांनी या करवीर नगरीला कुस्तीची नगरी आणि कलानगरी म्हणून ओळख दिली, त्या नगरीतील सर्व खेळाडू, महिला आणि पुरुष पहलवान एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की ही आंदोलनाची पहिली ठिणगी आहे. ही ठिणगी ज्वालामुखी होण्यापूर्वी ब्रिजभूषण याची खासदारकी रद्द करून त्यांना अटक करावी आणि जंतर - मंतरवर बसलेल्या महिलांना न्याय मिळवून द्यावा. - भारती पोवार ; आंदोलक, सर्व पक्षीय महिला संघर्षकृती समिती