कोल्हापूर - जिल्ह्यातील खासगी सावकाराच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यातून पोलिसांनी जमिनीची कागदपत्रे आणि विविध दस्तऐवजसह 20 हजार रुपये रोख जप्त केले आहेत. पांडुरंग बाळू पाटील (घरपण, ता. पन्हाळा) असे पोलिसांनी छापा टाकलेल्या सावकाराचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील घरपण गावातील पांडुरंग बाळू पाटील हा गेल्या अनेक वर्षांपासून खासगी सावकारकीचा व्यवसाय करत आहे. त्याने आजपर्यंत अनेकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. जबरदस्तीने धमकावून कोरे धनादेश आणि स्टँप लिहून घेतल्याची पोलिसांना तक्रार मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी शहानिशा करून कारवाईच्या सूचना दिली होती. सावकार पाटील याच्या घरावर कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. टी. इंगवले यांच्यासह त्यांच्या पथकाने टाकला. या छाप्यात पन्हाळाचे सहाय्यक निबंधक शिरीष तळेकर हेदेखील सहभागी झालेहोते.
पोलिसांना छाप्यात आढळले सातबारा उतारे आणि कोरे धनादेश
विविध कोरे धनादेश, सातबारा उतारे, कच्च्या नोंदी असलेली वही, स्टॅम्प पेपर व विविध दस्तऐवजासह रोख रक्कम मिळून आली. त्यानुसार सावकारावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पांडुरंग बाळू पाटील याच्या विरोधात कोणाची तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. टी. इंगवले यांनी केले आहे.
दरम्यान, बेकायदेशीरपणे सावकारकीचा व्यवसाय करणे गुन्हा आहे. शेतकऱ्यांची व आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तींची सावकारांकडून लुबाडणूक होवू नये, यासाठी कायद्यात शिक्षेची कठोर तरतूद आहे.