कोल्हापूर - शहरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. 19 दिवसानंतर कोल्हापुरात कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरातील हा मूळचा रहिवासी असून शनिवारी त्यांना कोल्हापुरात आणण्यात आले होते. इराणहून एकूण 4 जणांना कोल्हापुरात आणण्यात आले होते. त्यातील 3 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पुणे आणि मिरज येथील प्रयोगशाळेकडून पुन्हा तपासणी होणार आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतानाही त्यांना कोल्हापुरात पुन्हा का आणले? पण हे चौघेही VVIP आहेत का? एकीकडे मरणाच्या भीतीने हजारो नागरिक शेकडो किलोमीटर चालत, टँकरमधून आणि विविध पर्यायाने आपल्या गावी येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यांना कसे काय आणण्यात आले? असे अनेक सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये अडकलेल्या कोल्हापुरातील 4 जणांना विशेष विमानाद्वारे राजस्थानमध्ये आणले होते. त्यांना राजस्थानमध्येच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शनिवारी कोल्हापुरात आणण्यात आले. कोल्हापुरात आल्यानंतर त्या चारही जणांना थेट सीपीआरमध्ये पुन्हा दाखल करण्यात आले. त्या चौघांचे स्वॅब कोल्हापुरातल्या शेंडा पार्क येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातील चौघांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि नागाळा पार्क येथील व्यक्तीचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापुरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. याची माहिती पसरताच सोशल मीडिया सुद्धा अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूर शेंडा पार्क येथील नव्याने झालेल्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत इराण होऊन आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे मात्र याबाबत पुणे व मिरज येथील शासकीय प्रयोगशाळेकडून पुन्हा तपासणी होणार आहे.