कोल्हापूर - गोकुळच्या निवडणुकीत विरोधकांच्या शाहू शेतकरी आघाडीला पहिला धक्का आज बसला आहे. आघाडीतील माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची पुन्हा घर वापसी करण्यात सत्ताधारी गटाला यश आले आहे. स्थानिक राजकारणाला महत्त्व देत मी सत्ताधारी गटासोबत रहाण्याचा निर्णय घेतला आहे. असे सत्यजित पाटील- सरूडकर यांनी ई-टीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे. आज गोकुळचे सर्वेसर्वा माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
असे जुळले समीकरण
गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची नवी समीकरणं जिल्ह्यासमोर येत आहेत. गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच निवडणुकीमधील रंगत वाढत आहे. चार दिवसांपूर्वी सत्यजित पाटील सरुडकर यांनी विरोधी राजर्षी शाहू आघाडीस पाठिंबा दिला होता. त्यानंतर आमदार विनय कोरे यांनीही याच आघाडीला पाठिंबा दिल्याने सरुडकर गटातून विरोधी प्रतिक्रिया उमटली होती. कोरे गटाकडून पन्हाळ्यातून अमर पाटील तर काँग्रेसकडून शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार विधानसभेला कोरे यांच्यासोबत असतात. त्यामुळे गोकुळची ताकद मिळाल्यास आपल्या अडचणी वाढतील, असे सरुडकर गटाला वाटत होते. त्यावरून त्यांच्यात धुसफूस सुरु होती. या आघाडीत राहायचे की नाही याचा फेरविचार करावा, असा दबाव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सत्यजित पाटील यांच्यावर होता. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी स्वतः पत्रक काढून स्पष्टीकरण देखील दिले होते. मात्र आज सत्यजित पाटील यांच्यासह जि.प.बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी आमदार पी.एन.पाटील आणि महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन सत्ताधारी आघाडीसोबत राहत असल्याचा विश्वास दिला आहे. सत्यजित पाटील यांच्याकडे शाहुवाडी – पन्हाळा तालुक्यातील बरेचसे ठराव आहे. त्यामुळे शाहू आघाडीला निवडणुकी अगोदरच मोठा झटका बसला आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी.एन. पाटील यांचे पुन्हा महत्व सिद्ध झाले आहे.
..म्हणून हा निर्णय घेतला
शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील आज शिवसैनिकांशी चर्चा केली. या चर्चमध्ये महाविकासआघाडी मध्ये इतर पक्षांचा समावेश झाल्यामुळे कोणावर हे पक्षीय बंधन राहिले नाही. स्थानिक राजकारणाला पोषक ठरेल व गावागावातील कार्यकर्त्यांना कुठेही अडचणीत येऊ नये, यासाठी आम्ही सत्तारुढ गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या राजकारणाच्या सोयीमुळे हा निर्णय घेण्याचे मला जनतेने भाग पाडले. अशी प्रतिक्रिया माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी दिली आहे.
हेही वाचा-बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, बघा खासदार नवनीत राणा यांची खास मुलाखत