कोल्हापूर - महापुरामुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग आज (सोमवार) वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र सध्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच या मार्गावरुन सोडण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
अद्याप महामार्गावर दीड फूट पाणी -
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला असल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी कमी झाल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. केवळ पेट्रोल-डिझेल, ऑक्सिजन टँकर यांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान महामार्गावर अद्यापही दीड फूट पाणी असल्याने चार चाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनास बंदी आहे. सायंकाळी पाणी कमी झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. याचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी घेतला आहे.
हेही वाचा -पूरग्रस्तांच्या मदतीचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत - उपमुख्यमंत्री