कोल्हापूर : यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाट सुटलेली पाहायला मिळाली. एस टी महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या अचूक नियोजनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगारातून वेळेत एसटी सुटल्याने अनेक प्रवाशांनी आपल्या लाल परीला पसंती दिली. एसटीमधून प्रवास करून महामंडळाला दहा कोटी रुपयांचा महसूल केला ( ST Corporation collect ten crores Revenue ) आहे. दिवाळी सुटीनिमित्त अनेक जण आपापल्या घरी किंवा आजोळी जात असतात. प्रवाशांची संख्या वाढणा हे गृहीत धरून एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने १५ दिवस अगोदरच अचूक नियोजन केले. जवळपास ६०० हून अधिक गाड्यांनी गेल्या दहा दिवसांत पाच लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवासी सेवा दिली आहे.
सुरक्षित प्रवासी सेवा : दरवर्षी दिवाळी ( Diwali ) सुट्या लागल्या की अनेक जण आपापल्या गावी जातात. त्यामुळे दिवाळी सणापूर्वी व दिवाळी सण संपताना प्रवाशांची गर्दी होते. मात्र एस टी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा फायदा खासगी वाहतूकदार घेत असतात. ऐन सणासुदीच्या काळात प्रवश्यांना वेटीस धरत खासगी वाहतूकदार भाडेवाढ करतात. पण, यंदा खासगी वाहतूकदारांनी नियमापेक्षा अधिक भाडे आकारल्यास कारवाईचा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला होता. यामुळे काही प्रमाणात का होईना याच्यावर पोलिसांचा अंकुश होताच. तर यंदा एसटी महामंडळाने ही दिवाळीची तयारी १५ दिवस अगोदर सुरू केली. यंत्रशाळेतून गाड्या दुरुस्त करून घेतल्या. त्याचबरोबर प्रत्येक गाडी वेळेत जिल्ह्याच्या सर्व मार्गांवर सुटतील, असे वेळेचे नियोजन केले. त्यानुसार सर्व आगारांनी अंमलबजावणी केली आणि त्याचे फळ म्हणून एसटीच्या सर्वच गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद लाभला.
दहा कोटी रुपयांचा महसूल एसटी महामंडळाला जवळपास दहा कोटी रुपयांचा महसूल मिळाला तर काल एका दिवसात एक कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. कोल्हापूर विभागाला काल एका दिवसात प्रथमच इतका उच्चांकी महसूल मिळाला असून, कोल्हापूर एसटी महामंडळाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. यात कोल्हापूर ते पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, पणजी, रत्नागिरी, बेळगाव या मार्गांवर सर्वाधिक प्रवाष्यानी प्रवास केला असून जिल्ह्यातील ११ ही आगारांतून गाड्या वेळेवर सुटतात का इथपासून ते अधिकारी , कर्मचारी वर्गाने मध्यवर्ती बसस्थानकावर रात्रंदिवस थांबून येणाऱ्या प्रवाशांना गाड्यांमध्ये बसण्याची सोय करून दिली. एसटीची साधी गाडी, नवी परिवर्तन गाडी, शिवशाही गाड्या, निमआराम गाड्यांना प्रवाशांची गर्दी होती.
दिवसाला ७५ लाखांपर्यंत महसूल : सुट्यांचा हंगाम नसताना एसटी महामंडळाला सरासरी दिवसाला ७५ लाखांपर्यंत महसूल मिळतो. मात्र, दिवाळीच्या दहा दिवसांच्या काळात चार दिवस एक कोटीपेक्षा अधिक महसूल मिळाला असून तर काल एका दिवसात एक कोटी ३९ लाख रुपये असा सर्व मिळून दहा कोटी ६५ लाखांचा महसूल मिळाला. दिवाळी काळात प्रवासीसेवा सक्षम देण्याबरोबरच जास्त महसूल मिळविण्यात कोल्हापूर विभागाचा राज्यात तिसरा क्रमांक ( Kolhapur Division on third) आला असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांनी दिली आहे.