कोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रमाणे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातदेखील कोरोना रुग्णांची संख्या स्फोटक बनत चालली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊनसाठी हालचाली मुख्यमंत्री कार्यालयाडुन सुरू झाल्या आहेत. त्याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप कोणीही दिलेला नाही. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना उपचासाठी दारोदार फिरावे लागत आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडल्याने जिल्ह्यासाठी नवीन 300 आयसीयू आणि 400 ऑक्सिजनेटेडबेडचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. मंजुरी नंतर दहा दिवसांत सुविधा मिळणार आहे. आयसीयू आणि मनुष्यबळाच्या सुविधेसाठी खासगी संस्थेकडून निविदा मागवल्या जाणार आहे. याबाबत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
कडक लॉकडाऊनसाठी जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील व्यावसायिकांनीही पाठिंबा दिला आहे. तसेच आजरा तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक उद्यापासून दहा दिवस स्वयंस्फूर्तीने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन ठेवणार आहेत. तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्यामूळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याबाबत प्रशासनाला त्यांनी निवेदन दिले आहे. आजरा तालुक्यात आता पर्यंत 350 कोरोना रुग्ण, तर आतापर्यत 10 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात यावा, यासाठी हालचाली सुरू असल्या तरी, कडक लॉकडाउन न करता सायंकाळी सात नंतर कडक लॉकडाऊन करा, अशी देखील मागणी होत आहे.