कोल्हापूर - शनिवारी कोल्हापुरात नवीन 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आणि संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 36 वर गेली होती. मात्र सायंकाळी कोल्हापूरला दिलासा देणारी बातमी सुद्धा आली.
एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 3 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. शिवाय त्यांना सीपीआरमधून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये आकुर्डे येथील एक रुग्ण, आंध्र प्रदेशातील एक रुग्ण आणि कोल्हापूर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. कोल्हापूर शहरामध्ये हा एकमेव रुग्ण होता. त्याचे रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आल्याने आता कोल्हापूर शहर कोरोनामुक्त झाले आहे. मात्र जिल्ह्यात सद्या 22 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.