कोल्हापूर - जिल्ह्यात सध्या पावसाचा हाहाकार सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या एकूण पन्नास फुटांवर आहे. पुढील काही वेळात पंचगंगा नदीची पाणीपातळी हे 50 फुटांवर जाऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफची आणखी एक टीम पाचारण करण्यात आली आहे. तसेच हवाई मार्गासाठी हेलिपॅड तयार करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा आपत्ती कक्षाला दहा हेलिपॅड तयार करण्याच्या सुचना -
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक नद्यांचे पाणी वाढत आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने कर्नाटकला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाऊस असाच वाढत राहिला तर शिरोली नाका येथे राष्ट्रीय महामार्ग बंद होऊन कोल्हापूरला पाण्याचा वेढा पडू शकतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती कक्षाला दहा हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना दिले आहेत. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
धोकादायक ठिकाणी बस घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल -
कोल्हापूरच्या पुरी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चौकशी केली आहे. या सगळ्या परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष आहे. तसेच धोकादायक ठिकाणी खाजगी बस घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
राधानगरी धरणाचे दरवाजे संध्याकाळपर्यंत उघडणारे -
कोल्हापूर मधील पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अलमट्टीतुन पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत कर्नाटक सरकारशी बोलणी सुरू आहे. योग्य नियोजन सुरू असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. दरम्यान धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणाचे दरवाजे संध्याकाळपर्यंत उघडतील. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
पुणे बेंगलोर हायवेवर अत्यावश्यक सेवेसाठी एक लाईन सुरू -
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग पुणे बेंगलोर हायवेवर मांगुर येथे पाणी आल्याने हा रस्ता सध्या वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. मात्र सांगली, सातारा येथील पोलीस अधिकाऱ्यांना ज्या त्या ठिकाणी वाहने थांबवण्याचे सूचना दिल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी एक लाईन सुरू ठेवण्याची सूचना ही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी; अनेक महत्वाचे मार्ग बंद