कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करुन माजी खासदार किरीट सोमैया यांनी शांतताप्रिय कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असे नागरी कृती समितीने म्हटले आहे. चिथावणीखोर भाषा वापरुन जनतेना डिवचण्याचा प्रयत्न सोमैया यांनी करू नये. अन्यथा लोकशाही मार्गाने सोमैया यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अशोक पोवार यांनी दिला आहे.
कायदेशीर मार्गाने तक्रारी करण्याचा सर्वांना अधिकार; पण स्टंटबाजी करू नये
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांवर आरोप करुन आपले स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करुन जनतेला भडकविण्याचे प्रयत्न किरीट सोमैया करत आहेत, असा आरोप कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. कोल्हापूरात काही काळ प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महागात पडेल वगैरे, अशी भाषा न वापरता किरीट सोमैया यांना समजावून आपले कर्तव्य मानून कोल्हापुरात शांतता, सलोखा राखण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे समितीचे म्हणणे आहे. कायदा सर्वांना समान आहे. कायदेशीर तक्रारी करण्याचे सर्वांनाच अधिकार आहेत. त्याप्रमाणे सोमैया यांनी रितसर तक्रारी कराव्यात. पण, स्टंटबाजी करुन सलोखा बिघडविण्याचे काम करू नये. केंद्रात असणाऱ्या आपल्या स्वत:च्या संबंधाचा वापर करुन महाराष्ट्राचे केंद्राकडे प्रलंबित जे प्रश्न आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न करावा, जनता त्यांची सदैव ऋणी राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
तर सोमैया यांच्या मुंबईतील घरासमोर येऊन लोकशाही मार्गाने आंदोलन
टाळेबंदीमुळे जनता अगोदरच त्रस्त झाली आहे. त्यातच बाहेरुन येऊन जिल्ह्यामध्ये चिथावणीखोर भाषा न वापरता कायदेशीर मार्ग जरुर अवलंबावा. पण, कोल्हापूरचे वातावरण गढूळ होईल असे वर्तन करू नये. अन्यथा कोल्हापूरच्या जनतेलाही तुमच्या मुंबईतील घरासमोर येऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने दिला आहे.
हेही वाचा - जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम - सतेज पाटील