कोल्हापूर: गेल्या काही महिन्यापासून आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी त्यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, तसेच कोल्हापूर जिल्हा बँकेत घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर काही दिवसानंतर ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत कागदपत्राची तपासणी केली. यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सोमैय्या आज कोल्हापुरात आले आहेत.
कारवाईचा पाठपुरावा करणार: आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ परिवाराचा घोटाळा जो 158 कोटीचा दिसत होता. तो आता 500 कोटीहून अधिक असल्याचा आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी जिल्हा बँकेला ही सोडले नाही यामुळे मी आज कोल्हापूर जिल्हा बँकेला भेट देणार असून चौकशी आणि ईडीने केलेल्या कारवाईचा पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर टीका: मुश्रीफ यांनी अशा पद्धतीने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि जिल्हा बँकेला असे लुटले की, आता त्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. हसन मुश्रीफ यांना आता लक्षात आले आहे की, गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमैया जीवाची ही काळजी करणार नाहीत. मुश्रीफ यांनी तर प्रतिज्ञा घेतली होती की, किरीट सोमैया यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही. मात्र आता त्यांचे पाय कुठे कुठे घसरले आहेत हे दिसत आहे. शब्दात त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे.
मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन: दरम्यान किरीट सोमैया हे हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका करत असले तरी हसन मुश्रीफ यांनी काल पत्रक काढत त्यांचे स्वागत केले आहे. तसेच कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहनही केले. प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर बँकेने गेल्या आठ वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेच्या संचालक मंडळात विविध पक्षांचे प्रतिनिधी आहेत. सर्व संचालक मंडळ एकमताने आणि अतिशय विश्वासाने काम करत आहेत. सध्या बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून दि. ३१ डिसेंबर २०२२ अखेर बँकेला १०५ कोटी नफा झाला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
कार्यकर्त्यांनी शांतता राखावी: किरीट सोमैया यांचे जिल्हा बँकेमध्ये स्वागतच आहे. त्यांना आवश्यक असणारी माहिती बँकेचे प्रशासन देईलच. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. बँकेत या आणि जी माहिती हवी असेल ती घ्या, असे किरीट सोमैया यांना आपण यापूर्वीच आवाहन केले आहे. कदाचित त्यानुसार ते येत असावेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
असा असणार दौरा: जिल्हा बँकेवर ईडीने छापा टाकल्यानंतर, भाजप नेते किरीट सोमैया आज पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या दौऱ्यात ते सकाळी विभागीय सहनिबंधकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर जिल्हा बँकेला भेट देणार आहे. दुपारी त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक झाल्यानंतर दुपारी समरजितसिंह घाटगे यांच्या निवासस्थानी भोजन घेऊन पुण्याला रवाना होणार आहेत. तर किरीट सोमैया हे जिल्हा बँकेत जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.