कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आम आदमी पार्टीने संपूर्ण देशभर आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून काल कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आली आणि पत्रकार परिषद घेऊन या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई यांनी स्वत:ची वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिलेली आहे असे भाजपने म्हटले आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, काल शहरभरात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी बॅनरबाजी झाली याची जबाबदारी आम आदमी पक्षाने स्वीकारली आहे. एखादी अतिरेकी संघटना ज्याप्रमाणे आपल्या कृत्याची कबुली देते अशीच पद्धत या संघटनेची आहे. अशा कुरापती करायला या संघटनांना पैसा कुठून येतो, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर अशा संघटनांना बळ कुठून मिळते, देशाबाहेरील विघातक शक्तींचा यामागे हात आहे का? याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे, असेही चिकोडे यांनी नमूद केले.
तर जशास तसे उत्तर: त्याचबरोबर या निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाच्यावतीने पोलीस प्रशासनास सूचित करण्यात आले की, अशा पद्धतीने देशाच्या पंतप्रधानांचा बदनामी करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही. तसेच यापुढेही त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अशीच राहिल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल. याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असेही निवेदनात भाजपने म्हटले आहे.
नवी दिल्लीही पोस्टर वॉर: आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरूच आहे. आम आदमी पार्टीने ३० मार्च रोजी देशभर मोदी हटाओ देश बचाओ पोस्टर्स लावण्याचे नियोजन केले आहे. यासाठी 11 भाषांमध्ये पोस्टरही जारी करण्यात आले होते. यापूर्वी जिल्ह्यातील सर्वच भागात मोदी हटाओ देश बचाओचे पोस्टर लावण्यात आले होते, मात्र आता आम आदमी पक्षाने हे पोस्टर देशभरात लावण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर 11 भाषांमध्ये हे पोस्टर लावण्यात येणार आहे. यासाठी पोस्टर्सही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे पोस्टर्स हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी, मल्याळम, उडिया, कन्नड, बांगला, गुजराती, उर्दू आणि तेलगू भाषांमध्ये लावले जातील.
देशात हुकूमशाही सुरू: आम आदमी पार्टीचे दिल्ली प्रदेश संयोजक गोपाल राय म्हणाले की, देशात भाजपची अघोषित हुकूमशाही सुरू आहे. भाजप लोकशाही संपवण्यात मग्न आहे. भाजप निवडणूक आयोग, सीबीआय आणि ईडीला आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयावरही नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, निवडून आलेल्या राज्य सरकारांना देशात स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही. आता देश आणि विरोधक कोणत्याही प्रकारे क्रॅब मशीन आणि बनावट एफआयआरला घाबरणार नाहीत.