कोल्हापूर - श्री संत बाळूमामा यांच्या नावाचा वापर करुन लाखो भक्तांची फसवणूक करणाऱ्या सोलापूरच्या मनोहर भोसले यांनी चौकशी करा. अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन करू, असा इशारा श्री संत बाळूमामा भक्तांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर जर कोणी बाळुमामाच्या नावाचा वापर करून भक्तांची लूट करत असेल, तर त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
हे स्वतःला बाळूमामाचे वंशज आणि शिष्य असल्याचा दावा कसकाय करतात
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यामध्ये संत बाळूमामा याचा मोठा भक्त वर्ग आहे. श्री संत बाळूमामा यांचे मूळ स्थान कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथे आहे. त्यामुळे याच संतांच्या भूमीत बाळूमामाचे अनुयायी बाळूमामाच्या दर्शनाला येतात. मात्र, याचा फायदा घेत करमाळा तालुक्यातील उंदरगाव इथले मनोहर भोसले यांनी स्वतःला बाळूमामाचे वंशज आणि शिष्य असल्याचा दावा करत असल्याचा आरोप आदमपूर ग्रामपंचायतीने केला आहे. खरे तर बाळूमामा यांचे कोणीच वंशज नाही, त्याचा शिष्यवर्ग हा कोणी एकटा नाही. अवघा भक्त वर्ग हा बाळूमामांचा शिष्य आहे.
मनोहर भोसले याचा बाळूमामा यांच्याशी कोणताच संबंध नाही
सगळा भक्त वर्ग बाळूमामा यांचा शिष्य असताना उंदरगाव इथले मनोहर भोसले यांनी स्वतःला बाळूमामा याचे वंशज आणि शिष्य कसे काय घोषीत केले आहे, असा सवाल श्री सदगुरू संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आणि आदमपूर ग्रामपंचायतीने उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर मनोहर भोसले याचा बाळूमामा यांच्याशी कोणताच संबंध नाही, अस असताना भोसले हे भक्तांची दिशाभूल करत फसवणूक करत असल्याचा आरोपही यावेळी करण्याता आला आहे.
असा ठराव आदमापूर ग्रामपंचातीने केला
श्री बाळूमामा यांच्या भक्त वर्गाने उंदरगाव इथले मनोहर भोसले यांच्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे. बाळूमामा यांना भक्ती, भजन आणि कीर्तन इतकेच क्रमप्राप्त आहे. अस असताना मनोहर भोसले हे भक्तांची लूट करत आहेत. हे बाळूमामा यांच्या तत्वात बसत नाही असे भक्तांचे म्हणणे आहे. बाळूमामांनी आपल्या हयातीत कोणाकडूनही एक दमडीही घेतली नाही. असे असताना बाळूमामाच्या नावाचा वापर करून कोणी तुंबडी भरत असेल, तर ते आम्ही कदापी मान्य करणार नाही असा ठराव आदमापूर ग्रामपंचातीने केला आहे. श्री बाळूमामा यांच्या नावाने आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, हा वाद पाहता एका वाहिनीवर सुरू असलेल्या श्री बाळूमामाच्या मालिकेतून मनोहर भोसलेचा फोटो हटवला आहे.