कोल्हापूर - दारू पिऊन आईला नेहमीच त्रास देत असणाऱ्या पित्याचा मुलानेच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कागल तालुक्यातील केनवडे गावात ही घटना घडली असून संशयित आरोपी अमोल दत्तात्रय पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, वडिलांचा खून करून नंतर हा अपघात आहे, असे भासविण्याचा सुद्धा मुलाने प्रयत्न केला, मात्र शेवटी चौकशीत मुलानेच खून केल्याचे समोर आले.
सुरुवातीला अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यूची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय पाटील हे केनवडे गावचे रहिवासी असून ते इचलकरंजी येथे राहायचे. त्यांचा मुलगा आणि पत्नी केनवडे गावातच राहतात. मात्र, दत्तात्रय हे अधून मधून केनवडेमध्ये येत होते. शिवाय घरातील काही वादामुळे ते नेहमी दारू पिऊन मुलगा अमोल दत्तात्रय, तसेच पत्नीलासुद्धा मारहाण आणि शिवीगाळ करायचे. त्याचा राग अमोलच्या डोक्यात होता. दोन दिवसांपूर्वीसुद्धा पाटील यांनी पुन्हा दारू पिऊन घरात वाद घातला. त्यानंतर ते घरातून बाहेर पडले, मात्र अमोलने त्यांना कागल ते निढोरी रस्त्यावर गाठले आणि एका लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यावर मारले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - शेतकऱ्यांचा सत्याग्रह, आंदोलनाची व्याप्ती पाहून सरकार हादरले - राजू शेट्टी
अमोलने मृतदेह रस्त्याच्या बाजूला ठेवला व तो घरी परतला. पोलिसांना सुद्धा रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पाहणी केली. प्राथमिक स्वरुपात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू, अशी नोंद झाली. मात्र, कागल पोलिसांना संशय आल्याने अधिक चौकशी केली असता दत्तात्रय पाटील यांचा मुलगा अमोल याने खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अमोलकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी अमोल दत्तात्रय पाटील याला अटक केली.