कोल्हापूर - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सर्वत्र केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, कोल्हापुरात एका पेट्रोल पंप चालकाने पेट्रोल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने समाचार घेतला आहे. स्वतःच्याच पेट्रोल पंपावर एक फलक झळकला आहे. पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पहावेत, छातीत कळ आल्यास पंपधारक जबाबदार नाहीत, असा उल्लेख केला आहे. असा फलक पेट्रोल पंपावर झळकल्यानंतर जिल्ह्यासह राज्यभरात याची चर्चा जोरदार सुरू आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या उच्चांकी दरवाढीमुळे सध्या देशभरात सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर देखील केंद्र सरकार इंधन दरवाढीवरून ट्रोल होत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिम्स सध्या व्हायरल होत आहेत. त्यातच या इंधन दरवाढीचा समाचार कोल्हापुरातील गोकुळ शिरगावमध्ये असणाऱ्या एका पंप चालकाने घेतला आहे.
पालकमंत्री सतेज पाटलांचे ट्विट
अच्छे दिन, कोल्हापुरी टोला, असे हॅशटॅग वापरत गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल पंपावरील डिजीटल फलकाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी मोदी सरकारवर उपहासात्मक टोला लगावला आहे.
स्वतःच्याच पेट्रोल पंपावर अनोख्या पद्धतीचा फलक लावत इंधन दरवाढीचा निषेध केला आहे. या फलकावर 'पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर बघावेत, छातीत कळा आल्यास पंपधारक जबाबदार नाहीत' असा मजकूर आहे. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. पुणे-बंगलोर महामार्गावर अशा पद्धतीने इंधन दरवाढीचा निषेध झाल्यानंतर त्याची चर्चा आता राज्यासह राज्याबाहेर होऊ लागली आहे. त्याबाबत पंप चालकांशी संपर्क साधला असता हा प्रकार खोडसाळपणातून झाला असल्याचे त्यांनी सांगितले.