कोल्हापूर - राज्य पातळीवर हॉकी खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम प्रशिक्षकास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय मनुगडे असे जन्मठेप झालेल्या आरोपी प्रशिक्षकाचे नाव आहे. आरोपी प्रशिक्षकाने मुलींसोबत लैंगिक चाळे करुन एका मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. मे 2017 मध्ये त्याने या मुलींवर अत्याचार केला होता. झालेला प्रकार बाहेर सांगितल्यास खेळ बंद करुन बदनामी करण्याची धमकीही आरोपीने या मुलींना दिली होती. या सर्व मुली कोल्हापूर मधील शाळेत शिकत होत्या.
कोल्हापूरच्या एका शाळेमध्ये हा नराधम शिक्षक ८ वर्षांपासून क्रीडा प्रशिक्षक पदावर काम करीत होता. हॉकीचे प्रशिक्षण देताना आरोपी प्रशिक्षक मनुगडे हा पीडित मुलींचा वेळोवेळी विनयभंग करत असे. आरोपीने एका मुलीस खेळासाठी लागणारे कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने राहत्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर आरोपीने शाळेतील वरच्या मजल्यावरील एका खोलीत दोन ते तीन वेळा बलात्कार केला होता. आरोपीने मोबाईलवर या मुलीबरोबर स्वत:चे अश्लील फोटो काढून हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तुझी बदनामी करीन, शिवाय खेळ बंद करेन. अशी धमकी दिली होती. हा प्रकार १ मे ते १६ ऑगस्ट २०१७ च्या कालावधीत घडला होता. याचबरोबर शाळेतीलच आणखी तीन अल्पवयीन मुलींचा सुद्धा त्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानुसार त्याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने या नराधम प्रशिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.