कोल्हापूर - पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी खास पाहायला मिळते. याच पुरोगामी विचारांना चालना देण्याचे काम कोल्हापुरातील मुजावर आणि यादव कुटुंबीयांनी केले आहे. जाती आणि धर्माच्या भिंती मोडून अगदी थाटात या दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या मुलांचे लग्न लावून दिले आहे. मुलगा हिंदू धर्मीय तर मुलगी मुस्लिम आहे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या या कुटुंबांनी एकाच मंडपात हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने आपल्या मुलांचा लग्नसोहळा पार पाडला. या दोन पद्धतीच्या एका लग्नामागची गोष्ट काय आहे, त्याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपार्ट...
मुजावर आणि यादव कुटुंबाची अनेक वर्षांपासून मैत्री -
मुजावर आणि यादव कुटुंबांचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. यातूनच वधू मारशा नदीम मुजावर आणि मुलगा सत्यजित संजय यादव यांची ओळख झाली. गेल्या 10 वर्षांपासून या दोघांची चांगली मैत्री होती. त्याचं मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, मुलगा हिंदू तर मुलगी मुस्लिम धर्मीय असल्याने आपले भविष्यात लग्न होईल का हा विचार त्यांच्या मनात आला होता. मुलगा सिव्हिल इंजिनिअर तर मुलगी आर्किटेक्ट आहे. दोघेही उच्चशिक्षित असल्याने या दोघांनीही याबाबत घरच्यांना सांगायचे ठरवले.
आम्हालाही वाटत होते दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे -
मारशा मुजावर आणि सत्यजित यादव यांची मैत्री अतिशय घट्ट बनली होती. सर्वजण कुटुंबासोबत एकत्र असायचे. त्यामुळे मारशाच्या आई वडीलांना याबाबत थोडी थोडी कल्पना होती, असे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. मात्र, मुलगी कधी सांगते याची ते वाट पाहत होते. शेवटी मारशाने वडिलांना याबाबत सांगितले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. शाहू महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या मुजावर यांच्या डोक्यात सत्यजित हिंदू धर्मीय आहे हा विचारही आला नाही. मात्र, त्यांनी सत्यजितच्या घरच्यांकडून सुद्धा होकार आला तरच लग्नाबाबत पुढे बोलणी करण्याचे ठरवले.
यादव कुटुंबानेही दिला लग्नाला होकार -
सत्यजितने सुद्धा आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. दोन्ही घरांचे मैत्रीपूर्ण संबंध जरी असले तरी लोकं काय म्हणतील याबाबत त्यांच्या मनात थोडा विचार आला. मात्र, आपल्या मुलांच्या आनंदाच्या पुढे काहीही मोठे नाही, असे म्हणत त्यांनीही लग्नाला होकार दिला. गेल्या वर्षी म्हणजेच लॉकडाऊनमध्ये मारशा मुजावर आणि सत्यजित यादव यांचा साखरपुडा झाला. आता दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूरात त्यांचा लग्नसोहळा थाटात पार पडला.
सुरुवातीला मुस्लिम आणि नंतर हिंदू पद्धतीने विधी -
दोघांच्या लग्नाबाबत घरचे सर्वजण खूपच आनंदी होते. कोणाच्याही मनात या लग्नाबाबत आपण काहीतरी वेगळे करतो असे विचार नव्हते. लग्न हिंदू की मुस्लिम पद्धतीने करायचे हा विचार न करता दोन्ही पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. सुरुवातीला मौलानांच्या उपस्थितीत मुस्लिम पद्धतीने निकाह झाला. त्यानंतर हिंदू पद्धतीने अक्षता, सप्तपदी अशा विधी झाल्या. यावेळी उपस्थित पाहुण्यांना सुद्धा एकाच वेळी दोन्ही पद्धतीची लग्न पाहता आली. विशेष म्हणजे दोन्हीकडेच्या लोकांनी मुहूर्तमेढ, हळद, मेहंदी आदी विधी आनंदाने साजरे केले.
लोकांनी एकमेकांचे प्रेम पाहावे धर्म पाहू नये -
जाती-धर्माच्या पुढे जाऊन आपण सर्वांनी आता विचार करायला हवा. सर्वांनी एकमेकांचे प्रेम पाहावे त्यांचा धर्म पाहू नये, असा संदेश सुद्धा देत यादव आणि मुजावर कुटुंबाने कोल्हापूरसह संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.
हेही वाचा - ओडिशातील चंद्रपूरचा लखपती 'ब्लॉगर'!