रत्नागिरी - गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. वर्षभर अपार मेहनत घ्यायची आणि हातातोंडाशी आलेला घास मात्र निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून नेला, हे सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत. कोरोनानंतर कोकणातील शेतकऱ्यांवर आलेल्या या तुफानी संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडल्याचे दिसत आहे.
कोकणात भातशेतीचे ६८ हजार क्षेत्र तर नाचणीचे ९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक भात आहे. अनेकांचा उदरनिर्वाह हा आजही शेतीवर अवलंबून आहे. भातशेती कापण्यायोग्य झाली होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर ओसरला आणि कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान कापून सुकवण्यासाठी मळ्यातच ठेवलेले होते. मात्र, ढगफुटीप्रमाणे पडलेल्या पावसाचा तडाखा या भातशेतीला बसला आहे. कापून ठेवलेले धान पाण्यावर तरंगत असून, धान्याला कोंब आले आहे. हे धान्य काहीच उपयोगाचे नाही, पेंडाही वाया गेल्या. जनावरांना खायलाही त्याचा उपयोग नाही. वर्षभराची मेहनतच वाया गेली आहे. त्यामुळे शेतातील भिजलेले पीक उचलताना शेतकऱ्यांना भावना अनावर होत आहेत. काहींचे तर संपूर्ण पिकच वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्यामुळे या बळीराजाला आता गरज आहे, ती सरकारच्या भरीव मदतीची. याच सर्व परिस्थितीचा थेट शेतातून आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने.
हेही वाचा - वाचनालये सुरू झाल्याने वाचकांमध्ये उत्साही वातावरण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतायत खबरदारी