कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात रविवारी (दि. 21 मार्च) सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, या पावसाचा शेतातील रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे. दक्षिण भागातील गडहिंग्लज, नेसरी भागात तर पाऊसाने अक्षरशः झोडपून काढले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक तालुक्यात ढगाळ वातावरण
हवामान खात्याने कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण भागातील गडहिंग्लज, नेसरी या मोठ्या बाजारपेठ परिसरात तर सायंकाळच्या वेळी जोरदार पाऊस झाला. इचलकरंजी शहरातही आज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली असून काही ठिकाणी गारपीटही झाली. दरम्यान, पुढे काही तास असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - गावठी बॉम्बच्या अफवेने जयसिंगपूरमध्ये खळबळ
हेही वाचा - 'केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लावून महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा कट'