कोल्हापूर - जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. शेतीतील मशागतीची कामे पूर्ण करून मान्सूनची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना आज झालेल्या मुसळधार पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सकाळपासून जिल्हात ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास एक तास बरसलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दरम्यान, काल मान्सून केरळमध्य दाखल झाला असून महाराष्ट्राच्या अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पश्चिमेला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचाही परिणाम राज्यातील हवामानावर पडण्याची शक्यता आहे.