कोल्हापूर- यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी राज्यपालांवर टीका केली. यावेळी बोलण्याच्या ओघात काही अपशद्ब यशोमती ठाकूर यांच्या तोंडातून राज्यपालांसाठी चुकून निघाले असतील. मात्र राज्यपालांनी देखील राज्यघटनेचे महत्त्व ठेवावे, ते राज्यघटनेचे संकेत पाळत नाहीत. त्यांनी घटनेचं पद ओळखून काम केलं तर असे शब्द येणार नाहीत. असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपालांना दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
पुढे मुश्रीफ म्हणाले विधान परिषदेचे बारा आमदार निवडण्याची यादी राज्यपालांकडे दिली आहे. मात्र त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यपाल आणि सत्तारूढ गट आमनेसामने येतात. दरम्यान विधानसभेच्या अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. यावर देखील मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये अनेकजण संकटमोचक आहेत. त्यामुळे त्यावर लवकरच मार्ग निघेल.
इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार
आज राज्यभरात शिवसेना आणि भाजपच्या वतीने आंदोलन सुरू आहे. शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले. तर भाजपने वीजबिल विरोधात आंदोलन केले. लवकरच राष्ट्रवादी इधंन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची माहितीही यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.