कोल्हापूर- जिल्ह्यातील रांगोळी गावात पूरग्रस्तांना दिलेले पैसे पोलीस बंदोबस्तात पुन्हा वसूल करण्याचा प्रकार घडला आहे. पूरग्रस्त कोण हेच प्रशासनाला समजले नसल्याने घडलेल्या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून गावात तणावाचे वातावरण आहे.
महापुराचा फटका हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यानंतर 100 टक्के गाव पूरग्रस्त घोषित करत सर्वाना 5 हजारांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. मात्र त्यानंतर पूरग्रस्त आणि पूरबाधित या शब्दरचनेत प्रशासन अडकल्याने हे पैसे पुन्हा वसूल करण्यात आले. मात्र हे करत असताना पोलीस येऊन वसुली झाल्याने नागरिक संतप्त आहेत. प्रशासनाने सर्वेक्षण न करता ही मदत दिल्याने गोंधळ उडाल्याची चूक कबूल केली आहे. आता पुन्हा सर्वेक्षण करून मग मदत देऊ असे उत्तर सरकारी अधिकारी देत आहेत. प्रशासनाच्या चुकीच्या कामकाजाचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूरग्रस्त भागात मनमानी पद्धतीने जर निधीचे वाटप होत असेल तर त्यावर कोणाचा तरी अंकुश हवा नाहीतर यामध्ये पुराच्या पाण्याप्रमाणे काहीजण हात धुवून घेतील यात शंका नाही अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.