कोल्हापूर - जिल्ह्यातील नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. येणाऱ्या काळात अशी परिस्थिती नको असेल तर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये, विनाकारण बाहेर फीरू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. आज जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहाणी केली त्यावेळी ते बोलत होते.
बलकवडे पुढे बोलताना म्हणाले की, आज ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांसह नागरिकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद येणाऱ्या काळात देखील द्यावा. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनास्थिती भयानक आहे. ही स्थिती कोल्हापुरात निर्माण होऊ द्यायची नसेल तर नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय ते शक्य होणार नसल्याचे बलकवडे यांनी म्हटले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कामानिमित्तच नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामध्ये कोणी कामाशिवाय घराबाहेर पडत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची माहिती देखील यावेळी शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - सरकारडून टाळेबंदीसाठी हलचाली, दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता