कोल्हापूर- जिल्ह्यातील कागलमधल्या एका कोविड सेंटरमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणपती बसवणारे राज्यातील हे एकमेव कोविड सेंटर आहे. या कोविड सेंटरटचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत या कोविड सेंटर मधील गणपतीची आरती करण्यात आली. मुश्रीफ यांनी गणरायाला कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर, असे साकडे सुद्धा घातले. कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना झालेले हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिले उदाहरण आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले.
कोरोनाच्या जागतिक महामारीचे सावट श्री गणरायाच्या या उत्सवावर सुद्धा आहेत. या महामारीमुळे जनता गणरायाच्या स्वागताबरोबरच उत्सव आणि विसर्जनही आनंदाने करू शकत नाही. त्यामुळे जनता दुःखी झाली आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले. गणपतीचा विघ्नहर्ता म्हणून लौकिक आहे. गणपतीच्या आशीर्वादामुळे कोरोनाचे महाभयानक संकट लवकरच दूर होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कोरोना संदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सुद्धा मुश्रीफ यांनी घेत रुग्णांना उत्तम सेवा देण्याचे आवाहन केले.
यावेळी कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. डी. बी. शिंदे, जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता ए. जी. चांदणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, कागलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी श्रेयस जुवेकर, आरटीओ चेकपोस्टचे व्यवस्थापक नीलेश भोसले आदी उपस्थित होते.