कोल्हापूर - जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले यांना वीरमरण आले. यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर उंबरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो लोकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार पार पडले. शहीद जवान जोतिबा चौगुले अमर रहे', भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांमुळे सारा परिसर दणाणून गेला.
हेही वाचा... 'पायऱ्यांवर बसून विरोधकांनी आंदोलनं करू नयेत'
पाकिस्तान सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात 15 डिसेंबरला चौगुले यांना वीरगती प्राप्त झाली. मागील दोन दिवस त्यांचे कुटुंबीय आणि गडहिंग्लज तालुक्यातील नागरिक पार्थिवाच्या प्रतिक्षेत होते. आज बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या मूळ गावी उंबरवाडी येथे पार्थिव आणण्यात आले. महागाव ते उंबरवाडीपर्यंत फुलांनी सजवलेल्या रथातून जोतिबा चौगुले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर उंबरवाडी येथील राहत्या घरी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
हेही वाचा... CAA Protest Live : हिंसक आंदोलनानंतर ईशान्य दिल्लीत संचारबंदी, आंदोलकांची धरपकड सुरू
यावेळी त्यांची पत्नी, आई, वडील, बहीण, भाऊ व नातेवाईक उपस्थित होते. जोतिबा यांच्या 9 वर्षांच्या मुलाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.त्यांच्या आईच्या आक्रोशाने उपस्थित जनसमुदायाचे मन हेलावून गेले. यानंतर नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले. सुरुवातीला जिल्हा पोलीस दल तसेच यानंतर लष्कराच्या वतीने फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.