कोल्हापूर: लडाखच्या तुरतकमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत वीरमरण आलेले कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे सुपुत्र जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय शोकाकुल वातावरणात, वीर जवानाला अंतीम निरोप देण्यासाठी जमलेल्या जनसागराने पुष्पवृष्टी करत जाधव यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली.
दरम्यान, विरपत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम ठेवत जाधव यांना श्रद्धांजली देण्यात आली. त्यामुळे एकीकडे विधवा प्रथा बंदीचा निर्णय अनेक ग्रामपंचायती घेतला आहे. बसर्गे गावाने विरपत्नीला सन्मान देत कपाळावरील कुंकू कायम ठेवत आपल्या गावातील वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावानेही आजपासून विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय घेतला. शहीद जाधव यांच्या अंत्यसंस्कारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशांतला हीच खरी श्रद्धांजली असणार आहे आशा प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागल्या आहेत.
आज सकाळी आठ वाजता विशेष विमानाने जवान प्रशांत जाधव यांचे पार्थिव बेळगाव विमानतळावर आणण्यात आले. तेथून हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बसर्गे सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, त्यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर पत्नी आणि आई वडिलांनीच केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या अंत्ययात्रा मार्गात ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत त्यांना अभिवादन केले. लडाखमधील या अपघाताने देशाचे कधीच भरून न निघणारे नुकसान केले आहे. मात्र या जवानांचे हे बलिदान देश कधीच विसरणारही नाही अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, या दुर्घटनेत शहीद झालेले कोल्हापूरातील जवान प्रशांत जाधव आणि सातारा येथील शहीद सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असून त्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा : Encounter : पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक