कोल्हापूर - दारूची बाटली आणायला नकार दिला म्हणून नशेत असलेल्या मित्रांनीच आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथे घडली. अमित राठोड (वय 22 रा. इंगळीकर कॉलनी, माळवाडी), असे मृत तरुणाचे नाव असून समीर नदाफ व योगेश साखरे, अशी हल्लेखोर मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना काही तासातच अटक केली आहे.
नशा करत असताना घडला प्रकार
हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील काही युवक पंचगंगा नदी जवळील दर्ग्याच्या मागे असणाऱ्या शेतात नशा करण्यासाठी बसले होते. गांजा आणि दारूची पार्टी सुरू होती. दुपारी साडेचारच्या सुमारास दारूची बाटली आणण्यासाठी मित्रा-मित्रांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात समीर नदाफ (वय 20 वर्षे, रा. मराठी शाळेच्या मागे, शिरोली) आणि योगेश साखरे (वय 20 वर्षे, रा. पोवार मळा, शिरोली) या दोघांनी अमित राठोडला धारधार शस्त्राने भोसकले. यावेळी अमित राठोड रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. काही मित्रांनी जेवण तिथेच टाकून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या अमितला शुभम गव्हाणे आणि आदित्य पाटील या दोन मित्रांनी दुचाकीवरून जवळच असलेल्या केसवाणी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, गंभीर असल्याने त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमितला मृत घोषित केले. दरम्यान, शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच संशयित आरोपींना अटक केले.
हेही वाचा - गोकुळची आज सर्वसाधारण सभा, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात