कोल्हापूर - गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून सरासरी ७७.७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून कोणत्याही क्षणी उर्वरित तीन दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महापूर येण्याची शक्यता बघता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सध्या राधानगरी धरणातून ७३०० पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. भोगावती नदी ही पंचगंगा नदीला येऊन मिळते. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सहा फुटांनी वाढ झाली आहे. तर, राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी सध्या ३७.५ फूट इतकी आहे. इशारा पातळी ३९ फूट असून ४३ फूट धोका पातळी आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास धोका पातळी देखील ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महापूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, दुधगंगा धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या पावसाची परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासन सज्ज आहे. गेल्या वर्षीच्या अनुभव लक्षात घेता चार एनडीआरएफचे पथक यापूर्वी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
गेल्या 24 तासात हातकणंगले तालुक्यात २५.२५ मिमी, शिरोळ २०.७१ मिमी, पन्हाळा ६९.४३ मिमी, शाहूवाडी ७३ मिमी, राधानगरी ८९ मिमी,करवीर ६७.५५ मिमी,कागल ६१.७१ मिमी, गडहिंग्लज ६०.४३ मिमी, भुदरगड ९४.४० मिमी, आजरा ११६.२५ मिमी तर चंदगडमध्ये सर्वाधिक १३०.८३ मिमी, गगनबावडा १२४.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या जिल्ह्यातील इतर धरणामधून पुढील प्रमाणे विसर्ग चालू आहे -
तुळशी- ८८४ क्युसेक
वारणा-१४४८६ क्युसेक
दुधगंगा- १२९५० क्युसेक
कासारी- १७५० क्युसेक
कडवी -२५१९ क्युसेक
कुंभी - ६५० क्युसेक
पाटगाव - १०७२
चिकोत्रा - ००
चित्री -२००५ क्युसेक
जंगमहट्टि- ६३४ क्युसेक
घटप्रभा -२७२४ क्युसेक
जांबरे-२२६५ क्युसेक
कोदे- ८१८ क्युसेक