कोल्हापूर : दिल्लीतल्या आयआयटीमध्ये तज्ञ प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले ७३ वर्षीय डॉ. किरण शेठ हे सध्या भारत भ्रमण करत आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारी आणि तिथून परत दिल्ली अशा मार्गावर ते सायकलवरून प्रवास करत आहेत. १५ ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी या प्रवासाला श्रीनगर इथून सुरुवात केली. प्रवासादरम्यान दररोज तीस ते साठ किलोमीटर ते सायकलिंग करतात. डॉ. शेठ चालवत असलेली स्पीक मेके या संस्थेतील सदस्य देशभर विखुरलेले आहेत.
साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास : या प्रवासादरम्यान ते प्रत्येक गाव आणि शहरातील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत आहेत. शरीराच्या स्वास्थ्यासाठी व्यायाम करा, सायकलिंगमुळे एकांत प्राप्त होतो. व्यायामाने मन सक्षम होते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य चांगले ठेवा. भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन करा. महात्मा गांधींच्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा, या उद्देशान ते कार्यरत आहेत. त्यांच्या स्पीक मेके आंदोलनात देशभरातील शेकडो युवक सहभागी झालेत. गेल्या ४५ वर्षापासून ते हा उपक्रम राबवत आहेत. वर्षाला ५ हजार उपक्रम या आंदोलनाच्या माध्यमातून केले जातात. दिल्ली राजघाट इथून सुरुवात झालेल्या या यात्रेदरम्यान आपण साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास केला असल्याचे त्यांनी कोल्हापूर भेटी प्रसंगी सांगितले.
सायकल प्रवास केल्यामुळे निसर्गाला कोणतीही हानी होत नाही. सामाजिक स्वास्थ्य राखले जाते. देशभरातील महाविद्यालयीन युवकांपर्यंत गांधींचा विचार पोहोचला जावा, यासाठीच हा सायकल प्रवास. - डॉ. किरण शेठ
काय आहे चळवळ : 'सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंगस्ट युथ' ही एक देशव्यापी, स्वयंसेवी चळवळ आहे. ज्याची स्थापना 1977 मध्ये डॉ. किरण शेठ यांनी केली. भारतीय वारसा असलेल्या विविध पैलूंबद्दल जागरूकता वाढवून आणि त्यात अंतर्भूत मूल्ये आत्मसात करण्यासाठी आजच्या तरुणाईला मार्गदर्शन करणे, सामाजिक स्वास्थ्य दीर्घकाळ टिकण्यासाठी सायकल प्रवासाचे महत्त्व सांगणे, महात्मा गांधी यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा या चळवळीचा उद्देश आहे. जगाला अहिंसा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आज देशासाठी पूरक आहेत. मात्र आजच्या तरुणांपर्यंत महात्मा गांधींचे विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :