कोल्हापूर - कोल्हापुरात पुराच्या पाण्यामुळे अनेकजण घरांमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक आणि लष्कराचे पथकाची टीम कार्यरत आहे. कोल्हापूर महापालिकेमार्फत एकूण 889 कुटुंबातील 3 हजार 453 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. सोबतच 107 पाळीव प्राणी आणि जनावरे यांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफकडून आणखी 4 तर नौसेनेकडून आणखी 1 बोट मदत कार्यासाठी दाखल झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आढावा घेतला. सोबतच मुंबईतून वैद्यकीय पथक पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोल्हापूर शहरातील 16 बाधित ठिकाणाहून या कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यापैकी 545 कुटुंबे स्वत:हून नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाली आहेत. तर, चार ठिकाणावरून 107 पाळीव प्राणी आणि जनावरे यांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. नौसेनेच्या तिसऱ्या विमानाने आणखी 1 बोट तर एनडीआरएफच्या आणखी 4 बोटी मदत कार्यासाठी आल्या आहेत. यापैकी २ बोटी शिरोळ तालुक्यासाठी, 1 बोट इचलकरंजी-हातकणंगले परिसरासाठी व 1 शहरासाठी पाठविण्यात आली आहे. पुण्यावरून नौसेनेच्या आणखी बोटी दाखल होणार आहेत. तर, संध्याकाळपर्यंत पूर परिस्थिती नियंत्रणात असेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्यक्त केली आहे.