कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पंचगंगा नदीने 38.5 फुटांची पाणी पातळी गाठली आहे. त्यामुळे, नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू असून संभाव्य पूरस्थिती ओळखून येथील चिखलीतील ग्रामस्थांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सुरुवात केली आहे.
गेल्या 24 तासांपासून कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून सध्या राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून जवळपास साडेनऊ हजार क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील 68 बंधारे सध्या पाण्याखाली असून, कोकणाकडे जाणारा कोल्हापूर-गगनबावडा मार्गसुद्धा आता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शिवाय जिल्ह्यातील 4 राज्यमार्ग आणि 18 प्रमुख जिल्हा मार्ग सुद्धा बंद झाले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच एनडीआरएफची तीन पथके कोल्हापुरातील विविध भागात तैनात केली आहेत. 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाबरलेल्या चिखलीकरांनी आता आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सुरुवात केली आहे.
हेही वाचा : कोल्हापुरात पुन्हा महापुराची शक्यता, पंचगंगा कोणत्याही क्षणी ओलांडणार इशारा पातळी