कोल्हापूर - महापुराचा फटका येथील तालमीतील अनेक पैलवानांना देखील बसला आहे. येथील बहुतांश पैलवान बाहेर गावावरुन आले आहेत. त्यामुळे महापुराच्या काळात या पैलवानांचे चांगलेच हाल झाले आहेत.
महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून तालमीमध्ये विजेची सोय नाही, प्यायला पाणी नाही, जो नियमित आहार असतो तो देखील पैलवानांना मिळालेला नाही. काही सामाजिक संस्थांनी याठिकाणी अन्न - पाण्याची सुविधा पुरवली होती. मात्र, त्यावरच पैलवानांचे फक्त 2 दिवस निघाले.
आहार - विहारावर काटेकोरपणे लक्ष ठेवणाऱ्या पैलवानांनी मागील आठ दिवसांत डाळ भात खाऊन दिवस काढले आहेत. दरम्यान, काही पैलवानांनी आम्हाला खायला नसले, तरी चालेल. पण कोल्हापूरकरांचे जवजीवन लवकरात लवकर सुरळीत झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.