कोल्हापूर - अडीच वर्षाच्या बाळाच्या विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना हातकणंगले पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. हातकणंगले बसस्थानक परिसरात ही घटना घडली. यातील एक आरोपी पळून गेला असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. दरम्यान, यातील संशयित आरोपींनी यापूर्वीही अशाप्रकारे काही मुलांची विक्री केली आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत.
सापळा रचून केली कारवाई - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले येथील बसस्थानक परिसरात अडीच वर्षाच्या बालकाची विक्री करण्यासाठी काही लोक येणार असल्याची गोपनिय माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बाळाच्या विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या संतोष पुरी शिवपूरी गोस्वामी ( वय 40 वर्षे, रा. बेकाराई, ता. सारडा, जि. भीलवाडा, राजस्थान ), दिनेश नंदलाल बनभैरू ( वय 40 वर्षे, रा. लाडा, अकोला नाका, जि. वाशिम), कुसुमबाई देविदास गायकवाड ( वय 40 वर्षे, रा. राहुल नगर नांदेड), लक्ष्मी आदेश खरे ( वय 40 वर्षे, रा. नांदेड ), ललिता भिसे ( रा. कोरोची ता. हातकणंगले ) यांना त्यांच्या ताब्यातील लहान बाळासह ताब्यात घेण्यात आले असून संबंधित बाळास बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत.
संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी - यातील संशयित आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील आणखीन एक आरोपी महेश चौधरी ( रा. नांदेड ) हा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच यातील लहान बाळाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Waghave Gram Panchayat : विधवा प्रथा बंद करण्याचा वाघवे ग्रामपंचायतीचा निर्णय