कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावामधील मासेमारी करणाऱ्या नागरिकांची चांगलीच चंगळ झाली आहे. मासेमारी करत असताना अचानक 9 किलोचे चक्क दोन मासे त्यांच्या गळाला लागले आहेत.
मुसळधार पावसामुळे येथील कासारी नदीला पूर आला आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. येथील माजगाव पैकी माळवाडी गावातील संता भोमकर, मारुती भोमकर आणि धनाजी भोमकर यांनी नदीचे वळण बघून गळ लावले होते. अचानक गळाला मोठे मासे लागल्याचे समजल्यानंतर त्यांनी ते जोर लावून ओढण्याचा प्रयत्न केला. पण एकट्याच्या ताकदीने ते खेचता येईना त्यामुळे दोघांनी ओढून हे मासे बाहेर काढले. एवढे मोठे मासे गळाला लागल्याने भोमकर बंधूसुद्धा चांगलेच खुश झाले आहेत. वजन करून पाहिल्यानंतर या माशांचे प्रत्येकी 9 किलो वजन असल्याचे समजले. हे दोन्ही मासे मरळ आणि पानगा जातीचे आहेत.