कोल्हापूर - शिरोळ येथील पंचगंगा नदीत मासे मरण्याच्या प्रमाणात आता दुप्पटीने वाढ झाली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे आता हेच मृत मासे खाण्यासाठी नदीमध्ये मगरींचा वावर वाढला आहे. आज दुपारीसुद्धा नदीमध्ये मगरी मृत मासे खात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांच्या जीवितास सुद्धा धोका वाढला आहे. संबंधीत प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नदी परिसरात प्रचंड दुर्गंधी -
गेल्या 4 ते 5 दिवसांपासून शिरोळ बंधाऱ्यात मृत माशांचा अक्षरशः खच पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत जलआंदोलन सुद्धा केले आहे. मात्र, काही केल्या पंचगंगेतील प्रदूषण थांबले नाही. आजही मृत माशांचा खच लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत मृत मासे बाहेर सुद्धा काढले जात आहेत. मात्र, याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण -
गेल्या दोन दिवसांपासून शिरोळ येथील धरणाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्या पात्रात मगरींचे वारंवार दिसून येत आहे. याबाबत तहसिल विभागाला सुद्धा कळविण्यात आले आहे. याबाबत संबंधित विभागाला माहिती देऊन बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रदूषणाच्या मुख्य मुद्द्याकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिकांनी म्हटले असून प्रदूषणास जबाबदार सर्वच घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा होऊ लागली आहे.
हेही वाचा - याला म्हणतात खरं प्रेम...पाहा या प्रेमवेड्यानं 'व्हॅलेंटाईन डे' ला काय गिफ्ट दिलं