कोल्हापूर : जिल्ह्यातील मोठा दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआरच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आज पहाटेच्या सुमारास आग लागली. यानंतर आतील सर्वांना अन्यत्र हलवण्यात आले आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.
पहाटे आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. काही वेळात ही आग विझवण्यात यश आले. या सेंटर मध्ये एकूण 15 गंभीर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्या सर्वच रुग्णांना तात्काळ अपघात विभागात शिफ्ट करण्यात आले असल्याची माहिती सीपीआर रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकांत मस्के यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. दरम्यान, आग लागल्यानंतर रुग्णांना दुसऱ्या विभागात हलवताना एका महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एका जवानाचा हात भाजल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दौलत देसाई तातडीने सायकलने सीपीआर परिसरात पोहोचले. वेदगंगा इमारतीत असणाऱ्या ट्रॉमा केअर सेंटरची त्यांनी पाहणी केली. या विभागात कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. त्या रुग्णांना इतरत्र हलवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
हेही वाचा : 'कोल्हापूर अन् साताऱ्याची गादी एकच, फालतूगिरी केल्यास ठोकून काढू'