कोल्हापूर : तारदाळ येथील दिलीप कोळीचा मुलगा राहुल हा विवाहित होता. तो सतत मद्यपान करून कुटुंबाला त्रास देत होता. सततच्या त्रासाने त्याची पत्नी मुलांसह माहेरीच असते. राहुलच्या वागण्याला आई-वडील कंटाळले होते. या त्रासाला कंटाळून वडील दिलीप कोळी यांनी सुपारी देऊन मुलगा राहुल याचा खून केला होता.
वर्मी घावाने संशय बळावला : गुरुवारी पहाटेच्या सुमारास राहुलचा मृतदेह तारदाळ माळावर आढळल्याची माहिती शहापूर पोलिसांना समजली. आयकॉनिक कंपनीच्या मागील बाजूस रेल्वे रुळाच्या लगत राहुलचा मृतदेह सापडला. रेल्वेला धडक बसून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र मृतदेहाच्या डोक्यावरचे वर्मी घाव आणि काही अंतरापर्यंत रक्ताचे थेंब अन् थारोळे दिसून आले. शवविच्छेदनात राहुलच्या डोक्यावर वर्मी घाव बसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत या खुनाचा छडा लावला.
वडिल दिलीप कोळीने साथीदारांसह रचला डाव : शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, घातपातच्या दृष्टीने तपास केला. त्यानुसार पोलिसांनी राहुलच्या नातेवाईकांकडे चौकशी करत वडील दिलीप, भाऊ सचिन यांच्याकडे विचारणा केली. चौकशीत पोलिसांना वडिलांचा दाट संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. रात्री उशिरा कौटुंबिक वादातून वडील दिलीप कोळी यांनी दोन साथीदारांसह राहुलचा खून केल्याची कबुली दिली.
75 हजारात राहुलचा गेम : मृत मुलगा राहुल कोळी दारू पिऊन वारंवार त्रास द्यायचा. यामुळे कोळी कुटुंबीय हतबल झाले होते. काबाडकष्ट करून आणलेला पैसा राहुल घरात भांडण करून दारूसाठी मागायचा. यामुळे राहुल आणि वडील दिलीप कोळी यांच्यात वारंवार वाद व्हायचे. या वादातूनच ७५ हजार रुपयांची सुपारी देऊन दिलीप कोळी यांनी विकास पोवार व सतीश कांबळे या साथीदारांच्या मदतीने राहूलचा गेम करण्याची सुपारी दिली. सुरुवातीला २५ हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम खून झाल्यानंतर देण्याचा व्यवहार झाल्याची स्पष्टता कोळी याने तपासात दिली. जन्मदात्या पित्यानेच सुपारी देऊन मुलाचा खून केल्याच्या घटना वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -