कोल्हापूूर - महावितरणच्या गलथान कारभारामुळे पन्हाळा तालुक्यातील बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला आहे. पन्हाळा तालुक्यातील माले येथे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास विजेच्या धक्याने बाबासो पांडुरंग पाटील (वय 48) आणि त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील (16) यांचा मृत्यू झाला. एकाच घरातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यत होत आहे.
पन्हाळा तालुक्यातील उत्रे येतील बाबासो पांडुरंग पाटील हे माले येथे घरजावई म्हणून राहत होते. ते आज सकाळी शेतावर जनावरांना चारा आणण्यासाठी दोन मुले आणि सासऱ्यांसोबत गेले होते. शेतात असलेल्या विजेच्या खांबाच्या तारेला त्यांचा मुलगा राजवर्धनचा स्पर्श झाला. त्याला ओढण्यासाठी बाबासो पाटील यांनी मुलाला स्पर्श केला आणि त्यांनाही विजेचा झटका बसून त्यांचाही जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान त्यांचा लहान मुलगा देखील त्याच दिशेने जात असताना त्याच्या अजोबांनी त्याला मागे ओढलं त्यामुळे तो वाचला पण महावितरणच्या गलथान कारभारामुळे बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला.
वीज वितरण कंपनी काही आर्थिक मदत करेलही पण त्या दोन जीवांची कुटुंबातील पोकळी कोण भरून काढणार? असा सवाल नातेवाईक उपस्थित करत आहेत. अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी महावितरणने वेळीच ऑडिट करून तारांची आणि खांबांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. जिल्ह्यात इतर गावांमध्येही पूर्वी शेतकऱ्यांचा अशाप्रकारे मृत्यू झाला आहे.