कोल्हापूर - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यात अनेकांनी घरातच राहणे पसंद केले. मात्र, कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये एका कुटुंबीयांनी शेतीसाठी आयुष्याभरासाठी पाण्याची सोय केली. त्यांनी लॉकडाउनच्या काळात स्वतःच्या शेतात मेहनत घेत चक्क १५ फूट विहीर खोदली.
'जबतक तोडेंगे नही, तबतक छोडेंगे नही' हा मांझी चित्रपटातील नवाजद्दीन सिद्दीकीचा डायलॉग कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये राहणाऱ्या चिरमुरे कुटुंबीयांना लागू पडतो. धुळप्पा चिरमुरे यांची जमीनीला फक्त पावसाळ्यात पाणी मिळायच. इतरवेळी पाच ते सहा किलोमीटरवरून चौथाइनं शेतीला पाणी मिळत होते. पण शेतीसाठी खर्च जास्त आणि उत्पन्न कमी येत होते. त्यामुळे शेती करणे परवडत नव्हते. मात्र, घरची काळी माती आहे म्हणून चिरमुरे दाम्पत्य शेती करत होते. त्यातून कसाबसा उदरनिर्वाह व्हायचा. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि दोन्ही पोरं घरी आली. त्यामुळे उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न निर्माण झाला. तसेच दोन्ही मुलं घरात राहून काय करणार? त्यामुळे त्यांनी विहीर खोदण्याचे ठरवले. हातात खोरे, पार, कुदळ आणि डोक्यावर पाटी घेऊ विहिर खोदण्याचे काम सुरू झाले.
सकाळी ८ वाजल्यापासून सुरू काम दुपारी १ वाजताच थांबायचे. त्यानंतर दुपारी ३ वाजता काम सुरू व्हायचे आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालायचे. मुलगा अजितने कुदळीने विहिरीतील मुरूम बाजूला केला. जवळपास दोन महिने उलटल्यानंतर 20 बाय 20 ची विहीर 15 फुटांवर खोदली गेली आणि तो दिवस उजाडला. त्यांच्या कष्टाचं सोनं झालं. 16 व्या फुटांवर विहिरीला पाण्याचा झरा लागला. तरीही या विहिरीचं काम तीन महिन्यांपासून सातत्याने सुरूच आहे. पण चिरमुरे कुटुंबीय इतक्यावरच थांबणार नाही. जोपर्यंत पूर्ण पाणी लागणार नाही, तोपर्यंत विहिरीचं काम सुरूच राहील, असेच धुळप्पा चिरमुरे सांगतात.