कोल्हापूर - एप्रिल महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात ५० पेक्षा कमी रुग्ण होते. ती संख्या आता १२ हजारच्या वर गेली आहे. निष्क्रीय आणि अपयशी पालकमंत्र्यांच्या कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची जनतेची भावना आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, सतेज पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घ्यावे आणि हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी पत्रकाद्वारे ही मागणी केलीये. शिवाय नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप विरोधात आंदोलनाचा फार्स करण्यात आला, अशी टिकाही महाडिक यांनी केली.
धनंजय महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे की, संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्हा कोविडसाठी हॉटस्पॉट बनला आहे. या आजारामुळे जिल्ह्यात दररोज १५ ते २० जण मृत्यूमुखी पडत आहेत, तर दररोज बाधितांच्या संख्येत ५०० हून अधिकची भर पडत आहे. रुग्णांसाठी बेड नाही, आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असून, क्वारंटाईन सेंटरमध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि सुविधांची वाणवा आहे. त्याचबरोबर वाढीव वीज बीलामुळे सर्वसामान्य हैराण आहे, वीज स्थीर आकारावरून उद्योजक संकटात आहे. या सर्व प्रश्नांवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून उत्तर दिले जात नाही. सर्वकाही अलबेल असल्याचा भास निर्माण करण्यात ते मश्गुल आहेत. म्हणूनच या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप विरोधात आंदोलनाचा फार्स करण्यात आला, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली आहे.