कोल्हापूर - संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा आज सायंकाळी दसरा चौक येथे पार पडला. दसरा चौक मैदानात मंडपासह एक शामियाना उभा केला होता. सायंकाळी ६ वाजून 14 मिनिटांनी दसरा चौकात सोने लुटण्याचा (शमीपूजन) कार्यक्रम पार पडला.
हेही वाचा- दसरा मेळावा! शिवसेनेसाठी आता सत्ता हिच 'शीव' झाली आहे का?
सव्वा पाचच्या सुमारास भवानी मंडपातून शाही लवाजम्यासह भवानी मातेची पालखी सोहळ्यासाठी मंदिरातून बाहेर पडली. यासोबत अंबाबाई आणि गुरुमहाराज यांच्या पालख्याही परंपरेनुसार ऐतिहासिक दसरा चौकात दाखल झाल्या. श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे, यशराजे यांचे न्यू पॅलेस इथून मेबॅक गाडीतून पारंपारिक लवाजम्यासह दसरा चौकात आगमन झाले. त्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. यावेळी सोने लुटण्यासाठी कोल्हापूरकरांची एकच झुंबड उडाली. शिवाय श्रीमंत शाहू छत्रपती यांनी जनतेला सोने दिले आणि जनतेकडून सोने सुद्धा स्वीकार करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. सोहळ्यानंतर परंपरेनुसार अंबाबाईची पालखी पुन्हा मंदिराकडे रवाना झाली.