कोल्हापूर - महापुरामुळे कोल्हापूरातील आंबेवाडी आणि चिखली ही दोन्ही गावं पाण्यात बुडाली. अनेकांनी दुसरा मजला आणि छतांचा आधार घेतला. शेकडो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले तर अनेक जनावरे या महापुरात बुडून मृत्युमुखी पडली. अनेक जनावरं छतावर बांधली आहेत. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून गावात लाईट नाही. आता गावांत पोहोचताच एक भयाण शांतता पाहायला मिळते. गावात येणाऱ्या प्रत्येक बोटीकडे गावातील लोक घोळका करून खायला काय घेऊन आला आहे का? असे जेंव्हा विचारतात तेंव्हा अक्षरशः कोणत्याही व्यक्तीला हुंदका आवरता येणार नाही अशीच काहीशी भयानक परिस्थिती या गावांमध्ये पाहायला मिळते. याच दोन्ही गावांत नेमकी काय परिस्थिती आहे. कोणत्या अडचणी आणि समस्या आता आहेत हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारत पोहोचले थेट चिखली गावामध्ये.
गावातील हजारो लोकांना सुरक्षित बाहेर काढले असून अजूनही गावात मोठ्या संख्येने लोक आहेत. शेकडो जनावरे डोळ्यासमोर पाण्यात बुडल्याचे इथले नागरिक सांगतात. त्यामुळे जनावरांना सोडून जाण्यासाठी अनेकजण तयार होत नाही आहे. गावात आता 500 ते 600 नागरिक अजूनही आहेत. या मध्ये काही महिला सुद्धा आहेत. बोटीतून आलेले काही खाद्यपदार्थ सोडून येथील महिला आता जमेल तेव्हड्यांचे जेवण बनवून खात आहेत. उरलेल्या काही जनावरांना बोटीद्वारे आलेला पशु आहार खायला देत आहेत.
5 दिवसांपासून या जनावरांना खायला काही मिळालेले नाही आहे. कालपासून सुरू झालेल्या पशु आहारावरच त्यांनी आपली भूक भागवली आहे. अनेक जनावरं घाबरून अगदी निपचित पडल्याचे पाहायला मिळते आहे. आज जेंव्हा पशु वैद्यकीय सेवा मिळाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला. अनेकांनी तर औषधे घेऊन आलेल्या कोस्टगार्ड जवानांना पाणावलेल्या डोळ्यांनी धन्यवाद देत आम्हाला पुनर्जन्म दिल्याचे म्हंटले आहे. आजपर्यंत अशा प्रकारचा महापूर जिल्ह्याने अनुभवला नाही आहे. अनेक जनावरे बुडून मरण पावल्याने गावात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पुढे जाऊन चिखली गावाला महापुरानंतर आता आरोग्याच्या सुद्धा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.