कोल्हापूर - ऑनलाईन शिक्षणावर भर दिल्यामुळे कोल्हापुरात संगणक आणि लॅपटॉपच्या विक्रीमध्ये दुप्पटीपेक्षा जास्त वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही कंपन्यांचे लॅपटॉप खरेदी करायचे असतील तर बुकिंग करून वाट पाहावी लागत आहे. एकीकडे ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी आहेत. दुर्गम, ग्रामीण भागात तर ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्नच येत नाही. अनेक ठिकाणी कधी रस्तेच बनले नाहीत, तिथे कसले आले ऑनलाईन शिक्षण? एकीकडे हे सर्व खरे असले तरिही दुसरीकडे मात्र हे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये महत्वाच्या कंपन्यांचे लॅपटॉप पुरवणाऱ्या एका डीलरकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 118 नोंदणीकृत दुकानदार आहेत. त्यातील 70 ते 80 जण सेल्स मध्ये ऍक्टिव्ह आहेत. तर जिल्ह्यात 20 मोठे लॅपटॉपचे शोरूम आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक महिन्याला या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी जवळपास 500 ते 700 लॅपटॉपची विक्री होत असते. मात्र, सध्या यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 1600 हुन अधिक लॅपटॉपची मागणी वाढली असून तीनही जिल्ह्यांमध्ये मिळून जवळपास 5 हजार लॅपटॉपची विक्री झाली आहे. हीच परिस्थिती संगणक आणि इतर गॅजेट्सबाबत आहे. याला केवळ आणि केवळ ऑनलाईन शिक्षण हेच कारण असल्याचे लॅपटॉप डीलर अरुण माणगावे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पावसाची दडी; ऐंशी वर्षांचा बळीराजावर दुबार पेरणीचं संकट, पत्नीसह पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल
एका शोरूममध्ये भेट दिल्यानंतर तेथील परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी सुद्धा विक्रीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे म्हटले. 1 जून पासून त्यांच्या एका दुकानातून 250 ते 300 लॅपटॉपची विक्री झाली असल्याची माहिती मिळाली. इतर वेळी 70 ते 80 लॅपटॉप विक्री होतात. लॅपटॉप खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकांमध्ये बहुतांश ग्राहक ऑनलाईन शिक्षण हेच कारण सांगत असून काहीजण 'वर्क फ्रॉम होम'ची सुद्धा कारणे सांगत असल्याचे 'लॅपटॉप स्पेस'या दुकानाचे मालक निलेश यादव यांनी म्हटले आहे.
पालक सुद्धा कमीत कमी पैशांमध्ये चांगला लॅपटॉप घ्यायला पसंती देत आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने मुले एकसारखी मोबाईलमध्ये लक्ष असतात. मोबाईलमध्ये पेक्षा लॅपटॉप मध्ये अधिक चांगल्या प्रकारे दिसू शकते शिवाय इतर प्रोजेक्त आणि इतर गोष्टींसाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो त्यामुळे लॅपटॉप खरेदी करत आहेत.
हेही वाचा - एमआयएम नेत्याची कोरोनावर मात; स्वागतासाठी बेजबाबदार कार्यकर्त्यांनी उडविला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
आता भारतात ऑनलाईन शिक्षणाला महत्व दिले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र ग्रामीण भागातील मुले यापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने एखादी योजना राबवून खेडोपाड्यातील मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचवण्याची गरज असल्याचे काहींनी म्हटले आहे. 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या टॅब बनविण्यासंदर्भात एक मोठी संधी मिळत आहे. यासंदर्भात नेत्यांना माहिती दिली असून हे जर शक्य झाल्यास कमी किंमतीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये टॅब पाहायला मिळतील असे चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विद्यानंद मुंडे यांनी म्हटले आहे.
शासनाने एकीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थी यापासून वंचित आहेत. लॅपटॉप, संगणक किंव्हा टॅबलेट घ्यायची इच्छा आहे पण पैसे नसल्याने घेऊ शकत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने लक्ष देऊन लॅपटॉप आणि संगणक खरेदीवर सबसिडी देण्याची गरज असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे यांनी म्हटले आहे.
एकीकडे ऑनलाईन शिक्षणातील अडचणी तर अनेक आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणाला स्वीकारणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत असल्याचे चित्र कोल्हापूरात पाहायला मिळत आहे.