कोल्हापूर : उद्या 21 जुलैरोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दरवाढीसाठी 'राज्यव्यापी दूध बंद आंदोलन' आहे. या आंदोलनाला कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने पाठिंबा दिला होता. एकवेळचे दूध संकलन बंद ठेवाण्याचा गोकुळने निर्णय घेतला होता. याला आता विभागीय उपनिबंधकांनी आक्षेप घेतला आहे. शिवाय गोकुळला नोटीस पाठवत उद्या संकलन सुरू ठेवण्याचे आदेश दिले असून संकलन बंद केल्यास सहकार कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारासुद्धा या नोटीसमधून देण्यात आला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी उद्या राज्यातील सर्व दूध संकलन बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत दूध बंद आंदोलन यशस्वी करू असे म्हटले आहे. हे दूध बंद आंदोलन जीएसटी मागे घ्यावा, राज्य सरकारने दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावं, केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा, निर्यात अनुदान 30 रुपये द्यावं यासह अन्य मागणीसाठी करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने उडी घेत उद्या जिल्ह्यातील एक वेळचे दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयावर आक्षेप घेत प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत दुग्ध विभागाच्या उपनिबंधकांनी नोटीस काढून संकलन सुरू ठेवण्याबाबतचा आदेश दिला आहे. तसेच आदेशानुसार संकलन सुरू न ठेवल्यास कारवाईसुद्धा करू असा इशाराही नोटीसद्वारे दिला आहे.