कोल्हापूर: या एक दिवसीय साहित्य संमेलनाला उत्सवी स्वरूप न देता शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा झाली. या माध्यमातून भविष्यकालीन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरावी, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी ठोस उपाययोजना पुढे यावी तसेच शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर साहित्यातून आसूड ओढण्यात यावा हा उद्देश होता. बळीराजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना आतापर्यंत साहित्यामध्ये खूपच तोकडे स्थान मिळाले आहे. नांगरट सारख्या साहित्य संमेलनातून नवोदित लेखकांनाही शेतकऱ्यांचे प्रश्न समजावेत, यासाठी हे संमेलन भरविण्यात आले होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा: शासनकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. शेतकऱ्याला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रश्न पोट तिडकीने शासन दरबारी मांडणे गरजेचे आहे. नांगरट साहित्य संमेलनात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर ऊहापोह करण्यात आला. आता दरवर्षी जूनच्या पहिल्या रविवारी नांगरट साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
'या' व्यक्तींचा सन्मान: साहित्य संमेलनाचे स्वरूप पाहता शेतकरी हाच केंद्रबिंदू राहिला. हे स्मरणात ठेवून जे पत्रकार, विचारवंत, लेखक आणि चळवळीतील कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये संमेलनात शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी सहकार्य करणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी लढणारे पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पत्रकारिता क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर जेष्ठ शेतकरी नेते वामनराव चपट, जेष्ठ साहित्यिक डॉ. अ. हा. साळुंखे, ग्रामीण साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ, सुप्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
बळीराजाच्या व्यथा सादर: नांगरट साहित्य संमेलनाची सुरुवात 'जोगवा' चित्रपटातील गाण्यांवर आणि बळीराजाच्या व्यथा मांडून करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नैसर्गिक संकटांनी ग्रासलेला शेतकरी, कर्जाच्या बोजामुळे शेतकरी मुलाचे अपुरे राहिलेले शिक्षण अशा विविध प्रश्नांवर यावेळी कलाकृती सादर करण्यात आल्या.
हेही वाचा: