कोल्हापूर : प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. कोल्हापूर येथून प्रति वर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते. या दिंडीत शंभरहून अधिक गावातील दिंड्या सहभागी होत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे. आज सकाळी येथील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून शिवाजी पेठ मार्गे ही दिंडी सानेगुरुजी वाशी नाका मार्गे प्रति पंढरपूर नंदवाळ कडे रवाना झाली. यावेळी पहिला उभा रिंगण सोहळा खंडोबा तालिम येथे तर पुईखडी याठिकाणी असलेल्या मैदानात गोल रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील हजारो भाविक भर पावसात उपस्थित होते.
दर्शनानंतर भाविकांचा परतीचा प्रवास: यावेळी सर्वत्र विठू माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर ऐकू येत भर पावसात छत्र्यांसोबत भगवी पताका देखील प्रत्येकाच्या हातात दिसत होती. लहान असो किंवा ज्येष्ठ प्रत्येक जण भर पावसात विठू माऊलीच्या भक्तीमध्ये भिजून गेला होता. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर हा रिंगण पालखी पुढे मार्गस्थ होऊन नंदवाळ या गावी असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रवाना झाली. नंदवाळ येथे पालखी गेल्यानंतर येथे भक्तांच्या दर्शनासाठी काही काळ ठेवली जाते. तर दर्शन घेऊन भाविक परतीचा प्रवास करतात. आज सकाळपासूनच याठिकाणी भाविकांनी विठू माऊलीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली आहे.
काय आहे मंदिराचा इतिहास? नंदवाळ या गावचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. या ठिकाणी विठ्ठल मंदिर व शंकराचे पवित्र स्थान भिमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत. अशा प्राचीन देवतेच्या उपासनेसाठी याठिकाणी हेमाडपंती दगडी मंदिर आहे. या मंदिरांमध्ये विठ्ठल रोज रात्री वस्तीस असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवाय करवीर माहात्म्य या ग्रंथात असा उल्लेखही मिळतो. त्यामुळे या ठिकाणास प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. पंढरपूरप्रमाणेच नंदवाळ येथे विठ्ठलाच्या संबंधित सर्व सण-उत्सव साजरे होतात. येथेही रिंगण सोहळा, दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. आषाढी एकादशीला या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अगदी पंढरपूर प्रमाणेच येथे मोठी यात्रा भरते.
विठ्ठल 32 युगांपासून वास्तव्यास: नामदेव महाराजांनी तर आपल्या आरतीमध्ये 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' असा उल्लेख केला आहे. परंतु, इथे युगे बत्तीस असा का उल्लेख याचा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याचे कारण असे आहे, की 32 युगापूर्वी नंदवाळ (नंदिग्राम) याठिकाणी पुंडलिक मातृ-पितृ सेवा करीत होता. त्याची भक्ती पाहून त्याला वर देण्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंग याठिकाणी आले आणि त्यांनी येथेच वास्तव्य केले. नंदवाळ येथील विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निजस्थान असून ते दररोज मुक्कामासाठी, वास्तव्यासाठी विठ्ठल, राई (सत्यभामा), रखुमाई नंदवाळेमध्येच असतात. या तीनही स्वयंभू मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर अनेक दशकांपूर्वीचे आहे. हे जागृत देवस्थान असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे आणि याचा प्रत्यय अनेकांना आल्याचे येथे बोलले जाते.
हेही वाचा:
- Ashadhi Ekadashi 2023: वारकऱ्यांवर मशिदीतून पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी घेतला वारीमध्ये सहभाग, हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे दर्शन
- Ashadhi Ekadashi 2023 : शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी एकादशीनिमित्ताने शिर्डीत भाविकांची गर्दी
- Ashadhi Ekadashi 2023: बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे- मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे