बेळगाव: महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटकात जाऊन प्रचार करत आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सर्व पक्षांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. सेवाभागातील बेळगाव मधील निपाणी येथील भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी हा केवळ साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. ते कर्नाटकात काय करणार असे म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची टीका: कर्नाटक विधानसभा भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे बडे नेते कर्नाटकात जोरदार प्रचार करत आहेत. रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील सीमा भाग असलेल्या निपाणी मधील उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ गेले होते. यावेळी त्यांनी मतदारांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर: कर्नाटक विधानसभेत यंदा राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपले उमेदवार दिले आहे. तब्बल 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. एका बाजूला महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी असताना, कर्नाटकात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे आहेत. यामुळे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे. असा घनाघाती आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला होता.
भाजप उमेदवारांसाठी प्रचार: काँग्रेसची मते कमी करण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले होते. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते कर्नाटकात येऊन भाजप उमेदवारांसाठी प्रचार करत असल्याने, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. गेले काही दिवसांपूर्वी फडणवीस यांचे बेळगावात आगमन झाल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवून धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.