कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होताना दिसत आहे. दररोज एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळत असून, सरासरी 50 रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 94 हजार 603 वर पोहोचली असून, आतापर्यंत 77 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 3 हजार 270 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 13 हजार 963 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. त्यामुळे गेल्याच आठवड्यात टास्क फोर्सला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी उपचार पद्धतीतल्या त्रुटींमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहे. याशिवाय दररोज डेथ ऑडिट सुरू असून, मृत्यूमागील नेमक्या कारणांचा शोध घेऊन, उपचारांमधील त्रुटी दूर करण्याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती, सीपीआर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली आहे.
'एक महिन्यापासून दररोज डेथ ऑडिट'
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 हजार 270 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढतच असल्याने, गेल्या एक महिन्यापासून दररोज डेथ ऑडिट सुरू आहे. याबरोबरच मृत्यूची कारणे शोधून त्याप्रमाणे उपचार पद्धतीतील त्रुटी दूर करण्याचे देखील काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली आहे. दरम्यान 40 टक्के कोरोनाबाधित हे उपचारासाठी उशिर करतात, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. असं निरीक्षणातून समोर आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
'उपचारातील त्रुटींमुळे मृत्यूदर जास्त'
जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू का होत आहे याचा शोध, माहिती घेण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी टास्क फोर्सला पाचारण केले होते. त्यासाठी 12 मे रोजी पुण्याहून डॉ. सुभाष साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने कोल्हापूरला भेट दिली. यामध्ये त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयसह (सीपीआर) जिल्ह्यातील इतर रुग्णालयांना सुद्धा भेट दिली. यादरम्यान, येथील आरोग्य सुविधा, यंत्रणा, रुग्णांचे वाढते प्रमाण आणि त्याच्यांवर केल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. यामध्ये त्यांना अनेक त्रुटी आढळल्या असून, त्यांनी उपचार प्रणालीतील त्रुटींमुळेच मृत्यूंची संख्या वाढत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. शिवाय या त्रुटी दूर केल्यास मृत्यूची संख्या कमी होऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचा अहवाल त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सादर केला असून, त्यानुसार पुढील पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.
टास्क फोर्सच्या सूचना
1) सद्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांपैकी निम्मे रुग्ण घरातूनच उपचार घेत आहेत. मात्र आता रुग्णांवर घरात उपचार न करता कोविड सेंटरमध्ये उपचार करावेत.
2) रुग्णांना कोरोनाची लक्षणं दिसताच त्यांच्यावर उपचार सुरू करा. नागरीकांनी सुद्धा लक्षण दिसताच रुग्णालयात यावे.
3) उपचार पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामुळे मृत्यूदर वाढला असून, उपचार पद्धतीत सुधारणा करावी.
वयोगटानुसार कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1 वर्षाखालील - 150 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 3364 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 6888 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 53006 रुग्ण
51 ते 70 वर्ष -24775 रुग्ण
71 वर्षांवरील - 6420 रुग्ण
अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही
94 हजार 603 वर पोहोचली आहे.
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 23
2) भुदरगड - 23
3) चंदगड - 38
4) गडहिंग्लज - 70
5) गगनबावडा - 8
6) हातकणंगले - 153
7) कागल - 40
8) करवीर - 180
9) पन्हाळा - 82
10) राधानगरी - 29
11) शाहूवाडी - 6
12) शिरोळ - 112
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 170
14) कोल्हापुर महानगरपालिका - 272
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 131
गेल्या 24 तासांत असे एकूण 1 हजार 337 नवे रुग्ण आढळले असून, 1 हजार 456 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरणात जिल्हा आघाडीवर
एकीकडे जिल्ह्यात मृत्यूदर सर्वाधिक असला, तरी जिल्हा लसीकरणात मात्र आघाडीवर असल्याचे सद्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 10 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही काहीप्रमाणात जिल्ह्याला दिलासा देणारी बातमी आहे.
हेही वाचा - मुळचे मुंबईकर रियूबेन बंधू ठरले यूकेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती!