कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील गोठे गावात एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षाच्या मुलासह कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. दीपक शंकर पाटील, वैशाली दीपक पाटील आणि विघ्नेश दीपक पाटील, अशी या तिघांची नावे आहेत. आज(शुक्रवारी) सकाळी 8वाजता ही घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. 'आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये', अशी चिट्ठी सापडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जीवनात अयशस्वी झाल्याने आत्महत्या -
पन्हाळा तालुक्यातील गोठे गावात दिपक शंकर पाटील यांचा गेल्या अनेक वर्षांपासून सुखी संसार सुरू होता. त्यांना 12 वर्षांचा एक मुलगा आणि 16 वर्षांची एक मुलगी होती. मुलगी आपल्या आजोळी चिंचवडे (ता. करवीर) गेली होती. दीपक पाटील गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली पत्नी व 12 वर्षांच्या मुलासह कुंभी नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. दीपक पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहून ठेवली होती. 'माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. जीवनात अयशस्वी झाल्याने आम्ही आत्महत्या करत आहे. माझ्या मुलीचा आणि वडिलांचा सांभाळ करा', असेही चिट्ठीमध्ये लिहिलेले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - ही कसली संचारबंदी? नागरिक रस्त्यावर अन् कृषी उत्पन्न बाजार समितीत तोबा गर्दी