कोल्हापूर - येवती गावातील मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला तुफान गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे गावाच्या नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त असताना गावात हा सोहळा सुरू होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी असताना या ग्रामस्थांना हा सोहळा साजरा करण्यास परवानगी कोणी दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे घटना -
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच कोल्हापुरात या नियमांना ठेंगा दाखवला गेला. करवीर तालुक्यातील येवती गावात ग्रामस्थांनी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून 'ब्रेक द चेन'च्या नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवली. गावातील मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापनेचा धार्मिक सोहळा आयोजित करून नागरिकांनी गर्दी केली आहे. सामाजिक अंतर न पाळता आणि मास्क न वापरता ग्रामस्थांनी तुफान गर्दी केली होती.
पोलिसांना माहिती कशी मिळाली नाही -
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना या धार्मिक सोहळ्याला पोलीस प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने परवानगी कशी काय दिली? हा सवाल आता उपस्थित होत आहे. संचार बंदीच्या काळात पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये, असा नियम आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमाला बंदी असताना गावात जोरदार कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यावर आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.